विशेष प्रतिनिधी
मुंबई : दुचाकी वाहनांवर टोल लावण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दुचाकी वाहनांवर टोल लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही.” काही माध्यमांमध्ये या विषयावर दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याने त्यांनी सोशल मीडियावर स्वतः ट्विट करत जनतेच्या संभ्रमावर पडदा टाकला आहे. ( Gadkari clarifies on talks of toll on two-wheelerscondemns misleading news)
गडकरींनी स्पष्ट केलं की, “दुचाकी वाहनांसाठी टोलमुक्त सवलत पुढेही लागू राहील आणि या संदर्भात कुठलाही नवीन निर्णय झाला नाही.” त्यांनी अशा फेक बातम्यांचा समाचार घेताना माध्यमांची जबाबदारी अधोरेखित केली आणि म्हटलं की, “सत्यता पडताळणी न करता अशा प्रकारच्या बातम्या पसरवणे ही चांगल्या पत्रकारितेची खूण नाही. मी अशा बातम्यांचा तीव्र निषेध करतो.”
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर १५ जुलैपासून दुचाकींवर टोल लागू होणार असल्याची अफवा वेगाने पसरत होती. काही वाहतूक संघटनांनी यावर आक्षेप घेत सरकारला स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गडकरींचं स्पष्टीकरण महत्वाचं मानलं जात आहे.
दरम्यान, या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले, “जर दुचाकींवर टोल लावण्याचा विचार होत असेल, तर मग सरकारने पायी चालणाऱ्यांकडूनही टोल घ्यायला हवा. एवढंच नव्हे, तर त्या रस्त्यांवरून उडणाऱ्या पक्ष्यांनाही टोलच्या कक्षेत आणण्यासाठी अभ्यास समिती नेमावी, जेणेकरून शासकीय तिजोरी अधिक वेगाने भरू शकेल!”
गडकरींच्या या स्पष्टीकरणामुळे आता दुचाकीस्वारांनी निश्चिंत राहायला हरकत नाही. मात्र, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत जनतेने जागरूक राहणं आणि खात्रीशीर माहितीचाच स्वीकार करणं हेही तितकंच आवश्यक आहे.