विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंबईतील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आजमी यांच्यावर वारी संदर्भात दिलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली असून, संघर्ष सेनेचे कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी ही फिर्याद दिली आहे. ( Case registered against Abu Azmi in Pune for making objectionable statements about Wari)
आजमी यांनी नुकत्याच दिलेल्या एका भाषणात आषाढी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून हिंदू भावनांचा अवमान झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
तक्रारीनुसार, आजमी यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 299 (धार्मिक भावना दुखावणे) आणि 302 (द्वेष पसरवण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, संतोष साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला खपवून घेतले जाणार नाही. आम्ही कठोर कारवाईची मागणी करतो.”
सध्या महाराष्ट्रात आषाढी वारीची तयारी सुरू असताना, अशा वक्तव्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित भाषणाचा व्हिडीओ देखील तपासात घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, विविध वारकरी संघटनांनी आजमी यांच्यावर कारवाईची मागणी करत निषेध नोंदवला आहे. पुण्यात आणि इतर शहरांतही निषेध मोर्चे काढण्याची शक्यता असून, पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.
वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात. तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही.
मात्र, मुसलमानांनी रस्त्यावर नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात. मशिदी बाहेर नमाज पडू शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, बाहेर जर नमाज पडला तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग परवाना ही रद्द केला जाईल. पण वारीमुळे रस्ता जाम होतो. आम्ही कधी त्याला मनाई केले नाही, असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते.
या वक्तव्यावर टीकेचे मोहोळ उठल्यावर आझमी यांनी माफी मागितली होती. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले. माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवले गेले. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. माफी मागतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता.