विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळातच त्रिभाषा सूत्रासंदर्भात अहवाल स्वीकारण्यात आला होता. आधी अहवाल स्वीकारायचा आणि नंतर त्याला विरोध करायचा ही उद्धव ठाकरेंची भूमिका राजकीय आहे. महापालिका निवडणुका नसत्या तर या मुद्द्यावर एवढा विरोध झाला नसता. पण, आम्हीही मराठीच आहोत. मराठी मते ही काही कोणाची मक्तेदारी नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र मोर्चावर हल्लाबोल केला.
( No one has a monopoly on Marathi votes Devendra Fadnavis tells Thackeray brothers)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे आमचे मित्र असले तरी त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. सर्वांची एकच भूमिका असती तर सर्वजण एकाच पक्षात असते. पण उद्धव ठाकरे यांनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला असेल आणि आता ते त्या विरोधात बोलत असतील तर ते राजकीय आहे असे म्हणावे लागेल. रघुनाथ माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यावरती प्रश्नचिन्ह लावता येईल का? असे मान्य करू की एकवेळ देवेंद्र फडणवीसला राजकारण करायचे आहे. पण या मंडळींना राजकारण करायचे आहे का? असा सवाल करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यांनी दिलेला अहवाल तुम्ही स्वीकारला आणि आता विरोध करत आहात, याचा अर्थ राजकीय आहे, हे स्पष्ट होते.
राज आणि उद्धव ठाकरे जर मराठी असतील तर मी कुठे पंजाबी आहे? किंवा आमच्या पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आहेत आणि तेही मराठी आहेत. ते काही गुजराती नाहीत. त्यामुळे मराठी मतांची कोणाची मक्तेदारी नाही. आम्ही चांगले काम केले म्हणून मराठी माणसांनी आम्हाला मते दिली. जोपर्यंत आम्ही चांगले काम करत राहतो तोपर्यंत मराठी माणूस आम्हाला मते देईल, असा दावा फडणवीस यांनी केला.
राज ठाकरे यांना युतीत घेणार का? असा सवाल फडणवीस यांना विचारला असता सध्या तरी आमची युती ओरिजनल शिवसेना आणि ओरिजनल राष्ट्रवादीशी आहे. पण जर कोणी आमच्यासोबत येऊ इच्छित असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण अजून असा काही निर्णय आम्ही केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
२०१७ मध्ये मनात आणले असते तर भाजपचा महापौर झाला असता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा महापौर भावनिक मुद्दा असल्याचे सांगितल्याने आम्ही फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यांच्यासाठी महापौरपद सोडले, आम्ही मनात आणले असते तर पूर्ण जुळवाजुळव झाली होती. मात्र, आता येणारी मुंबई महापालिका निवडणूक जिंकू असा ठाम विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.