मुंबई : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. ८ व्या सुचीतील सर्वभाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ व भाजपाचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव हाणून पाडू व मराठीचा गळा घोटू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
( If Hindi is not compulsory from class 1 in Gujarat then why is it compulsory in Maharashtra Congress questions)
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, हिंदी भाषेचा सन्मानच आहे पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे. काही राजकीय पक्ष, संघटना व संस्था आपापल्या पद्धतीने या निर्णयाचा विरोध करत आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने मी साहित्यिकांना पत्र लिहून आवाहनही केले आहे. तर काही जण मोर्चा काढत आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा हीच सर्वांची दिशा आहे. हा संस्कृतीचा लढा आहे त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन लढले पाहिजे कोणाचा फोन वा निमंत्रण आले का हा प्रश्न महत्वाचा नाही. आम्ही पहिलीपासून हिंदीच्या सक्तीविरोधात लढत आहोत असेही सपकाळ म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी. गुजरातमध्ये एक निती व महाराष्ट्र दुसरी निती कशी हे फडणवीस व बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. तसेच गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट बद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.