विशेष प्रतिनिधी
बुलढाणा: बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील ग्रामस्थ अचानक टकले का होत आहेत त्याचे कारण समोर आले आहे. पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्यानेत्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत.
शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे. त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे. परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. खारपाणपट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे. मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे. फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केलं असून हा आजार पाण्यामुळे होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. गावातील पाणी, स्कीनचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभगाने दिली आहे.
गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार आहे? ही भानामती आहे की वेगळाच काही व्हायरस आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलं आहे.