विशेष प्रतिनिधी
कोलकाता : तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजु जनता दलाचे (BJD) नेते खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी केलेल्या विवाहावरून तृणमूल काँग्रेसच्याच एका खासदाराने जोरदार हल्लाबोल केला आहे. चाळीस वर्षांचे लग्न मोडून 65 वर्षीय व्यक्तीच्या पत्नीवर महुआ मोईत्रा यांनी अन्याय केला नाही का असा सवाल त्यांनी केला आहे. ( Kalyan Banerjee attacks Trinamool MP Mahua Moitra for breaking a 40-year-old marriage and doing injustice to the wife of a 65-year-old man)
कोलकाता लॉ कॉलेजमधील भीषण सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरवले असतानाच, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. खासदार महुआ मोईत्रा आणि ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद शिगेला पोहोचला असून, हा वाद वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला आहे.
कल्याण बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रांवर गंभीर आणि वैयक्तिक आरोप करत म्हटले की, “महुआ हनीमूनवरून परत आल्यावर माझ्याशी भांडायला लागली! त्या मला महिला विरोधी म्हणतात, पण त्या स्वतः काय आहेत? त्यांनी कोणाचे तरी ४० वर्षांचे लग्न मोडले आणि ६५ वर्षीय पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न केलं. हे दुसऱ्या महिलेविषयी अन्यायकारक नाही का?”
महुआ मोईत्रा यांनी गेल्या महिन्यात बीजेडीचे खासदार आणि सुप्रसिद्ध वकील पिनाकी मिश्रा यांच्याशी जर्मनीतील बर्लिन येथे विवाह केला होता. या वैयक्तिक उल्लेखावरून राजकीय चर्चेला उधाण आले.
२५ जून रोजी दक्षिण कोलकात्यातील लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षातील विधी विद्यार्थिनीवर कॉलेजच्या गार्ड रूममध्ये बलात्कार करण्यात आला होता. पीडितेने तक्रारीत सांगितले की, तिला फसवून बोलावले गेले आणि व्हिडिओद्वारे धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा तृणमूल छात्र परिषद (TMCP) या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित असून, त्याचे मंत्री फिरहाद हकीम व खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याशी संबंध असल्याचे आरोप झाले आहेत.
या प्रकरणात मनोजितसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे, ज्यात दोन विद्यार्थी आणि एक सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. वैद्यकीय तपासणीत बलात्कार सिद्ध झाल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर ठरले आहे.
पत्रकारांनी या प्रकरणावर बॅनर्जी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले, “जर कोणी मित्र आपल्या मैत्रिणीवर बलात्कार करतो, तर आपण काय करणार? प्रत्येक शैक्षणिक संस्थेत पोलिस तैनात करणार का? काही पुरुष हे विकृत प्रकार करतात, महिलांनी त्यांच्याशी लढा दिला पाहिजे.”
या विधानावर तीव्र संताप व्यक्त झाला. त्यानंतर टीएमसीने स्पष्टीकरण देत सांगितले, “कल्याण बॅनर्जी यांचे मत वैयक्तिक असून, ते पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत नाही. महिलांविरोधात गुन्ह्यांबाबत तृणमूल काँग्रेसची शून्य सहनशीलतेची भूमिका आहे. या गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची भूमिका आहे.”
महुआ मोईत्रा यांनी पक्षाचे नाव न घेता X (ट्विटर) पोस्टद्वारे प्रतिक्रिया देत म्हटले, “प्रत्येक पक्षात महिलांविरोधात द्वेष असलेली माणसं असतात. टीएमसीची खास बाब म्हणजे आम्ही अशा वादग्रस्त विधानांची निंदा करतो, त्याला पाठिंबा देत नाही.”
महुआच्या प्रतिक्रियेनंतर कल्याण बॅनर्जी अधिकच संतप्त झाले. त्यांनी पक्षाच्या अधिकृत स्पष्टीकरणालाही आव्हान दिले आणि विचारले, “हे विधान अप्रत्यक्षपणे अशा नेत्यांना पाठिंबा देते का जे गुन्हेगारांना वाचवतात?”
त्यांनी महुआ मोईत्रांवर टीका करत आणखी म्हटले, “जिच्यावर नैतिकतेच्या कारणास्तव संसदेतून निलंबनाची कारवाई झाली, ती मला नैतिकतेचे धडे देते आहे. ती स्वतःच सर्वात मोठी महिला विरोधी आहे. तिला फक्त स्वतःचं राजकीय भवितव्य आणि पैसा यांचाच विचार आहे.”