विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीणचा मागील आणि नवीन हप्ता आजपासून मिळणार आहे असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 3600 कोटी मंजूर केले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. ( Ladki Bhaeen Yojana installments will be deposited in accounts from today Rs 3600 crore approved)
राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनात सादर होणाऱ्या प्रत्येक विधेयकावर सखोल चर्चा व्हावी, कोणतेही विधेयक चर्चेशिवाय मंजूर होऊ नये, अशी शासनाची भूमिका आहे. विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघांतील प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि सभागृहाचा एकही मिनिट वाया जाणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल. आजपासून तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या पुरवणी मागण्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून आज त्या सभागृहात सादर केले जाणार आहे, अशी माहिती आजिर पवार यांनी दिली आहे.
यंदा प्रथमच जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने राज्यातील धरणाच्या पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची असे अजित पवार यांनी सांगितले.