विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर गंभीर आणि खळबळजनक आरोप करताना दावा केला आहे की, काँग्रेसच्या काळात तब्बल १५० खासदार हे सोव्हिएत युनियनचे एजंट म्हणून कार्यरत होते. त्यांना थेट सोव्हिएत युनियनकडून निधी मिळत होता.
( 150 Congress MPs were agents of the Soviet UnionSensational allegation by BJP MP)
दुबे यांनी हा दावा २०११ मध्ये सार्वजनिक झालेल्या सीआयएच्या एका गोपनीय दस्तऐवजाचा हवाला देत केला आहे. या दस्तऐवजात काँग्रेसच्या काळातील काही धक्कादायक बाबींचा उल्लेख आहे.
निशिकांत दुबे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे प्रकरण तत्कालीन काँग्रेस नेते एच.के.एल. भगत यांच्या कार्यकाळातील आहे. त्यांनी दावा केला की, सोव्हिएत युनियनने भारतातील काही पत्रकार, नोकरशहा, राजकीय पक्ष आणि उद्योजक गटांवर प्रभाव टाकण्यासाठी आपल्या गुप्तचर यंत्रणेचा वापर केला. सीआयएच्या अहवालानुसार, सोव्हिएत एजंटांनी भारतातील माध्यमांमध्ये तब्बल १६,००० लेख प्रकाशित करवले होते, ज्यामार्फत त्यांनी आपले गुप्त हेतू साध्य केले. याशिवाय, त्या काळात भारतात सुमारे १,१०० रशियन गुप्तचर अधिकारी कार्यरत होते, जे राजकीय नेते, नोकरशहा आणि मतप्रवर्तकांवर प्रभाव टाकत होते.
दुबे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, काँग्रेसच्या उमेदवार सुभद्रा जोशी यांना निवडणूक प्रचारासाठी जर्मन सरकारकडून ₹५ लाखांचा निधी मिळाला होता. या निवडणुकीत सुभद्रा जोशी पराभूत झाल्या, परंतु त्यानंतर त्यांनी ‘इंडो-जर्मन फोरम’च्या अध्यक्षा पदाची जबाबदारी स्वीकारली. दुबे यांनी हा दावा करताना काँग्रेसवर परकीय शक्तींच्या हितासाठी काम केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
निशिकांत दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले आहे, “काँग्रेसने नेहमीच देशाच्या हिताऐवजी परकीय शक्तींची चाकरी केली आहे. जेव्हा देशाच्या सुरक्षेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न येतो, तेव्हा काँग्रेसची भूमिका संशयास्पद आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात राहिली आहे. काँग्रेसच्या काळात परकीय शक्तींनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला. काँग्रेसने त्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहकार्य केले.
दुबे यांनी उल्लेख केलेला सीआयएचा गोपनीय दस्तऐवज २०११ मध्ये उघड झाला होता, ज्यामध्ये भारतातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परकीय शक्तींचा प्रभाव पडत असल्याचा दावा करण्यात आला होता. या दस्तऐवजात सोव्हिएत युनियनच्या केजीबी (KGB) या गुप्तचर यंत्रणेच्या भारतातील कारवायांचा उल्लेख आहे. यामध्ये राजकीय पक्ष, पत्रकार, आणि इतर प्रभावशाली व्यक्तींना निधी पुरवून प्रभाव टाकण्याचे प्रयत्न झाल्याचे नमूद आहे. मात्र, या दस्तऐवजाच्या सत्यतेवर आणि त्यातील तथ्यांवर काही तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सोव्हिएत युनियन आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या शतकात खूप जवळचे होते. विशेषतः १९७० आणि १९८० च्या दशकात भारताने सोव्हिएत युनियनकडून लष्करी आणि आर्थिक सहाय्य घेतले होते. याच काळात काँग्रेस पक्ष सत्तेत होता, आणि त्यांच्यावर परकीय शक्तींच्या जवळीकतेचे आरोप होत राहिले आहेत.