विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एका यूट्युब चॅनलवर गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर या बातमीमुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही बातमी मुद्दाम तयार करून पसरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ( Case filed against YouTube channel spreading rumours of Chhagan Bhujbals death)
शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास “@Nana127tv” नावाच्या यूट्युब चॅनलवर, “हेल्पलाइन किसान” या डिस्प्ले नावाखाली, “छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन” असा भ्रामक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओच्या थंबनेलवर एका लोकप्रिय वृत्तवाहिनीचा लोगो वापरण्यात आला होता, ज्यामुळे लोकांना अधिक विश्वास वाटावा असा हेतू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही तासांतच हा व्हिडिओ सुमारे 1.25 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे सोशल मीडियावर अफवा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, या व्हिडिओच्या मूळ आशयात रंजनीताई बोरस्ते यांच्या निधनाचा उल्लेख असून छगन भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचे दृश्य आहे. मात्र, टायटल आणि थंबनेलमध्ये छगन भुजबळ यांचे निधन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या चुकीच्या माहितीमुळे जनतेत तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे अंमलदार सुनील बहारवाल यांनी शहर सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 505(1)(b), 469, 500 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(C) व 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष शाखेचे अंमलदार सोशल मीडियावर सतत सर्फिंग करून आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवर लक्ष ठेवत असतात. याच सर्फिंगदरम्यान हा खळबळजनक व्हिडिओ आढळून आला. पोलिसांनी संबंधित यूट्युब चॅनलचे संपूर्ण डिजिटल ट्रॅकिंग सुरू केले असून लवकरच आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांविषयी जनजागृती आणि कायदेशीर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा कोणत्याही बातम्या फॉरवर्ड किंवा शेअर करण्यापूर्वी खात्री करण्याचे आवाहन केले आहे.