विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत कठोर पावले उचलली आहेत. यूपीएससी परीक्षेतील 2022 व 2023 च्या निकालांवर आधारित दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल वजिराओ अँड रेड्डी इन्स्टिट्यूट व स्टडी आयक्यू आयएएस यांच्यावर प्रत्येकी ₹7 लाख दंड ठोठावण्यात आला आहे, तर एज आयएएस वर ₹1 लाखाचा दंड लावण्यात आला आहे.
वजिराओ अँड रेड्डी इन्स्टिट्यूटने त्यांच्या जाहिरातीत दावा केला होता:
617 पैकी 933 विद्यार्थ्यांची UPSC CSE 2022 मध्ये निवड”
टॉप 10 AIR पैकी 7, टॉप 20 AIR पैकी 16, आणि टॉप 100 AIR पैकी 72”
आम्ही भारतातील सर्वोत्तम UPSC कोचिंग संस्थांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर”
CCPA च्या तपासात समोर आले की, या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू गाईडन्स प्रोग्राम घेतला होता. मात्र, संस्थेने कोणत्या विद्यार्थ्याने कोणता कोर्स घेतला याची माहिती जाहिरातीत दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या यशात फक्त इंटरव्ह्यू गाईडन्स प्रोग्रामचा वाटा असल्याचे कळू शकले नाही.
स्टडी आयक्यू आयएएसच्या खोट्या दाव्यांवर कारवाई
स्टडी आयक्यू आयएएसने जाहिरातीत दावा केला:
“UPSC CSE 2023 मध्ये 120+ निवडी”
“सक्सेस पक्का ऑफर” आणि “सेलेक्शन पक्का ऑफर”
CCPA ने तपासात निष्कर्ष काढला की 134 यशस्वी विद्यार्थ्यांपैकी 126 विद्यार्थ्यांनी फक्त इंटरव्ह्यू गाईडन्स प्रोग्राम घेतला होता. इतर विद्यार्थ्यांनी लहान कोर्सेस घेतले होते. मात्र, या जाहिरातीत या कोर्सेसचा उल्लेख नव्हता. तसेच “सक्सेस पक्का ऑफर” आणि “सेलेक्शन पक्का ऑफर” हे दावे सिद्ध करण्यात संस्थेला अपयश आले.
एज आयएएसवर ₹1 लाखाचा दंड
एज आयएएसने UPSC CSE 2023 च्या 13 यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यातील 11 विद्यार्थ्यांनी फक्त इंटरव्ह्यू गाईडन्स प्रोग्राम, तर 2 विद्यार्थ्यांनी मेंटोरिंग कोर्स घेतला होता. संस्थेने हे तपशील जाणीवपूर्वक लपवले होते.
CCPA चे कठोर पावले
CCPA च्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्यात येईल.
आतापर्यंत 45 कोचिंग संस्थांना नोटीस पाठवून 22 संस्थांवर एकूण ₹71.60 लाख दंड लावण्यात आला आहे.