विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील कोंढवा परिसरात एका २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कुरिअर बॉय म्हणून घरात प्रवेश करून तरुणीच्या तोंडावर पेपर स्प्रे मारून बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता, त्याने पीडितेच्या मोबाईलमधून सेल्फी काढला आणि “मजा आली मी पुन्हा येईन” असा मजकूर लिहून ठेवून निघून गेला. ( A man disguised as a courier boy raped a young woman; He sent a message saying he had fun and would come again and also took a selfie.)
ही घटना बुधवारी संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता घडली. पीडिता आपल्या भावासोबत सदनिकेत राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोसायटीत प्रवेश करताना कुरिअर डिलिव्हरीबॉय असल्याचा बहाणा केला. तो संबंधित तरुणीच्या घरी पोहोचला आणि तिला कुरिअर आहे असे सांगून दरवाजा उघडायला लावला. तरुणीने कोरिअर आपले नसल्याचे सांगितले असता, त्याने रजिस्टरवर नाकारल्याची स्वाक्षरी करण्याची विनंती केली.
तरुणीने सुरक्षेचा दरवाजा उघडताच आरोपीने तिच्या तोंडावर पेपर स्प्रे मारला आणि जबरदस्तीने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. नंतर पीडितेच्या मोबाईलवर सेल्फी काढून ‘मजा आली, पुन्हा येईन’ असा संदेश ठेवून तो फरार झाला.
पीडिता ज्या सोसायटीत राहते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रवेश नोंदणीची सोय असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, आरोपीने या यंत्रणांना चकवा देत परिसरात प्रवेश कसा केला याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, गेटवर नोंदणी आणि फोटो रजिस्ट्रेशनच्या नोंदी तपासण्यात येत आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हा गुन्हा पूर्वनियोजित असून आरोपीने सोसायटीतील सुरक्षेची माहिती आधीच घेतली असावी. आम्ही सीसीटीव्ही, फोनचे डिजिटल पुरावे, आणि अन्य तांत्रिक पुरावे गोळा करत आहोत. पीडितेला वैद्यकीय मदत आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे.”
या घटनेमुळे पुणे शहरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांच्या संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या घटनेविषयी कुणाकडे काही माहिती असल्यास त्वरित कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा.