विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी भाषेसाठी मेळावा आयोजित केला असून कोणत्याही पक्षाचा झेंडा तेथे असणार नाही असे मनसेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र मराठीसाठी मेळावा की कौटुंबिक स्नेहसंमेलन असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. ठाकरे कुटुंबाच्या या सोहळ्यात ठाकरे गट आणि मनसेच्या इतर नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात आली. ( A gathering for Marathi or a family reunionLeaders were shown there placebat the Thackeray family function!)
हिंदी सक्तीचा जीआर रद्द करत झाल्यावर ठाकरे बंधूंनी या विजयोत्सव मेळाव्याची घोषणा केली. जो मेळावा आज शनिवारी वरळी डोम येथे पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, नेत्या राखी जाधव, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शेतकरी नेते अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी व अन्य नेते उपस्थित होते. पण संपूर्ण कार्यक्रम म्हणजे ठाकरे कुटुंबाचा स्नेह मेळावा असल्याचे वातावरण होते. संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आले. पण यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर आल्याची.
यावेळी राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांचे कुटुंबिय देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ठाकरे कुटुंबाच्या दोन्ही सुनांनी मराठमोळेपण जपले. रश्मी ठाकरे या यावेळी साडीमध्ये तर शर्मिला ठाकरे यावेळी जांभळ्या रंगाच्या पैठणी ड्रेसमध्ये दिसल्या. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केवळ उद्धव आणि राज ठाकरे बसले. पण कार्यक्रमाची सांगता झाली आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब व्यासपीठावर आले. यावेळी कार्यक्रमाच्या सांगतेनंतर पहिल्यांदाच आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र व्यासपीठावर आले. दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून व्यासपीठावर आले. त्यानंतर दोघांनी हात उंचावून उपस्थितांचे आभार मानले.
राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे सर्वांनी एकत्रित उभे राहून फॅमिली फोटोसाठी पोज दिली. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर टीका करणारे ठाकरे बंधू यांच्यातील प्रेम दिसून आले. त्यात सुरुवातीला राज ठाकरे आपल्या खुर्चीवर बसायला गेले. त्यावेळी उद्धव यांनी त्यांना हस्तांदोलन केले. त्यानंतर लगेचच ते त्यांच्याशी काहीतरी बोलले आणि अखेर त्यांनी राज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
संपूर्ण राज्यभर तयारी करण्यात आलेल्या या मेळाव्यात महाविकास आघाडी असो किंवा मनसे कोणत्याही नेत्याला जागा देण्यात आली नाही. काँग्रेसने तर मेळाव्यावर जणू बहिष्कार टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहाणपणा दाखवून मेळाव्यास अनुपस्थित राणी पसंत केले. त्यांचा निर्णय किती योग्य होता हे एकंदर व्यासपीठावरून जाणवले.