विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : राज्यातील शेती अधिक फायद्याची व्हावी, उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी येत्या पाच वर्षांत दरवर्षी 5 हजार कोटी, एकूण 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये दिली आहे. ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, सिंचनासाठी पंप अशा योजनांचा या निधीतून समावेश असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ( Investment of Rs 25 thousand crores in five years to increase agricultural income Chief Minister visits farmers on the occasion of Ashadhi)
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शनिवारी सायंकाळी ‘कृषी पंढरी’ या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा, म्हणून राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठांशी थेट जोडणाऱ्या योजनाही बाजार समित्यांच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांना बहुउद्देशीय संस्थांमध्ये रूपांतरित करण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. या संस्थांना एकूण 18 प्रकारच्या व्यवसायांची परवानगी दिली जाणार असून त्या शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. मालाचे साठवण, कोल्ड स्टोअरेजची सुविधा, वितरण व्यवस्था मजबूत करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, योजनांचा लाभ घेण्याची माहिती मिळावी यासाठी कृषी प्रदर्शन भरवावे, अशी अपेक्षा माजी आमदार दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी २०१५ साली व्यक्त केली होती. तेव्हापासून दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे विविध विभाग, कृषी विद्यापीठे यांचे स्टॉल, विविध योजना, वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचाही समावेश आहे. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर, उत्पादकता वाढविण्यासाठीच्या वेगवेगळी पद्धतींचेही प्रदर्शन या ठिकाणी पहायला मिळत आहे. सेंद्रिय खते, नैसर्गिक खते, वेगवेगळ्या खतांचे मिश्रणे, माती परीक्षण ते कापणीपर्यंत पर्यंतच्या तंत्रज्ञानाची झलक येथे पाहायला मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले.