विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील जंगलराजची आठवण यावी अशा पद्धतीने राष्ट्रीय जनता दलाने गुंडांचे समर्थन सुरू केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात माजी खासदार आणि कुख्यात गुन्हेगार मोहम्मद शहाबुद्दीन याला ‘शहाबुद्दीनजी जिंदाबाद’ अशा घोषणा देत अभिवादन केले. या कार्यक्रमात त्यांनी शहाबुद्दीनच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुलगा ओसामा यांच्याकडून स्वागतही स्वीकारले.
( Remembering Jungle Raj in Bihar Tejaswi Yadav supports goons for Muslim appeasement)
शहाबुद्दीन हा राजकारणतील गुन्हेगारीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. कुख्यात डॉन असलेल्या शहाबुद्दीनने फरकाप उडवणाऱ्या पद्धतीने अनेक हत्या केल्या होत्या.
बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने यादव यांना अचानक शहाबुद्दीनवरील प्रेम उफाळून आले आहे. यामध्येराजकीय डावपेचाचा भाग असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरजेडी सर्व शक्यतेचा वापर करत असल्याचे हे उदाहरण मानले जात आहे.
शहाबुद्दीन याला लालू यादव यांच्या ‘जंगलराज’ काळात राजकीय संरक्षण मिळाले होते, त्याने बिहारच्या सिवान जिल्ह्यात स्वतःचे स्वतंत्र राज्य चालवले. १९९० मध्ये प्रथम विधानसभा निवडणूक जिंकून त्याने राजकारणात प्रवेश केला आणि नंतर १९९६ मध्ये खासदार म्हणून संसदेत पोहोचला. आरजेडी सत्तेवर आल्यानंतर त्याची ताकद आणखी वाढली. विरोधक त्याच्या मतदारसंघात पोस्टर लावण्यासही घाबरत असत.
शहाबुद्दीनवर अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते, तरीही पोलीस आणि प्रशासन त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करू शकत नव्हते. त्याने पोलिसांवर हल्ला करणे, अपहरण, खंडणी आणि खून यांसारखे गुन्हे खुलेआम केले.
२००४ मध्ये सिवान जिल्ह्यातील प्रतापपूर येथे शहाबुद्दीनने सतिश राज आणि गिरीश राज या दोन भावांवर ॲसिड टाकून त्यांची हत्या केली होती. त्यांच्या मालकीच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्यासाठी त्यांनी प्रतिकार केला म्हणून हा अमानुष प्रकार घडवण्यात आला. तिसरा भाऊ राजीव रोशन या घटनेचा एकमेव साक्षीदार होता, पण त्यालाही २०१४ मध्ये कोर्टात हजर होण्याच्या तीन दिवस आधी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या प्रकरणात शहाबुद्दीनला जन्मठेपेची शिक्षा झाली.
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत आयपीएस अधिकारी एस. के. सिंगल यांच्यावर गोळीबार करणारा शहाबुद्दीनच होता. मतदान केंद्रावर गोंधळ घातल्यामुळे जेव्हा सिंगल यांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने थेट गोळ्या झाडल्या. या प्रकरणात त्याला १० वर्षांची शिक्षा झाली होती.
२००४ मध्ये तुरुंगात असतानाही शहाबुद्दीनने निवडणूक लढवली आणि अनेक मतदान केंद्रे जबरदस्तीने ताब्यात घेतली गेली. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. तरीही त्याने निवडणूक जिंकली.
शहाबुद्दीनचा काळ सिवानसह बिहारच्या अनेक भागात दहशतीचा होता. लालू यादव यांचा ‘जंगलराज’ या शब्दाचा संदर्भच त्याच्या राजकीय उभारणीशी जोडला जातो. त्याच शहाबुद्दीनच्या नावाचा वापर आज तेजस्वी यादव निवडणूक जिंकण्यासाठी करत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण साधण्यासाठी आरजेडी पुन्हा एकदा जुन्याच मार्गाने चालत आहे, पण हे पक्षाच्या प्रतिमेला दीर्घकाळासाठी धोका ठरू शकते.