विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी बोलण्यासाठी अमराठी लोकांना होणाऱ्या मारहाणीचे पडसाद आता देशपातळीवर पडू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात संताप वाढत आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी यावरून थेट ठाकरे बंधूंना डिवचले आहे. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, असे म्हणत उर्दुबिलनाऱ्यांना मारून दाखवा असे आवाहन दिले आहे. ( Even a dog is a tiger in our house BJP MP challenges Thackeray brothers)
पहिलीपासून कथित हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून मीरा रोड येथे एका गुजराती भाषिकाला मराठी बोल म्हणून मारहाण करण्यात आली. वरळी येथे उध्दव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यात बोलताना कानाखाली आवाज काढा असा आदेश देत राज ठाकरेंनी हिंदी बोलणाऱ्यांना मारहाणीचे समर्थन केले. यावरून भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी एक्स (ट्विटर) या सोशल माध्यमावर पोस्ट केली आहे. दुबे यांनी म्हटले आहे की, हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा. निशिकांत दुबे यांनी ही पोस्ट राज ठाकरे आणि शिवसेना ( ठाकरे गट) यांनाही टॅग केली आहे.
दरम्यान, मुंबईतील मीरा रोड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सूचक इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, “भाषेवरून मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपली अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात. त्यामधील आपल्या अनेक माणसांना तेथील भाषा येत नाही. मग त्यांना पण अशाच प्रकारे वागणूक मिळाली तर? भारतामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी ही योग्य नाही. अशा प्रकारची गुंडगिरी कोणी केली तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल.
“भाषेवरून कोणी मारहाण करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. ज्या प्रकारची घटना घडली आहे, त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि कारावाई केली आहे यापुढेही अशा प्रकारे भाषेवरून कोणी वाद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. भारतातील कोणत्याही भाषेवर अशा प्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात. मग हा कोणता विचार आहे? त्यामुळे अशा प्रकारे जे लोक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.