विशेष प्रतिनिधी
सोलापूर : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील संशयित वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक,दोन कार,परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन,सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती पीडितेचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी दिली.
सुशीलने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक,दोन कार,परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. त्यावर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे .
बीडच्या मस्सजोग येथील खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एसआयटीच्या तपासात सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती लागला असून सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले वाल्मिक कराडशी दोनदा फोनवरून बोलला समोर आलं आहे. मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी कराडला सुदर्शनने पहिला कॉल केला. घुले आणि कराडचे दुसरे संभाषण सरपंच संतोष देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर झाल्याचंही समोर आले आहे.