विशेष प्रतिनिधी
राजगुरूनगर : राजगुरूनगरमध्ये मैत्रिणीच्या घरातील अडीच लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरून, काही महिन्यांनी तेच दागिने गळ्यात घालून व्हॉट्सअॅप स्टेटसवर फोटो टाकणाऱ्या महिलेला अखेर गजाआड करण्यात आले आहे. (Girlfriends theft exposed after wearing jewelry and posting it on WhatsApp status!
खेड पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव शितल अमोल वायदंडे (वय ३३, रा. पडाळवाडी, राजगुरूनगर, मुळगाव वडगाव हवेली, भिमकुंड, सातारा) असे आहे. तिच्यावर मैत्रिणीच्या घरातून दागिने चोरल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
फिर्यादी पुनम सत्यावान आदक (वय ३६, रा. आर्या रेसीडन्सी, पडाळवाडी रोड, थिगळस्थळ, राजगुरूनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वर्ष २०२१ मध्ये शितल वायदंडे त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होती. दोघींमध्ये चांगली मैत्री झाली होती आणि शितल यांचा घरात मोकळा वावर होता. पुनम यांच्या घरात स्टीलच्या डब्यात ठेवलेले दागिने मंगळसूत्र, नेकलेस, टॉप्स, अंगठ्या, सासूचे मणी, कानातले, वेल, बदाम इत्यादी शितलने पाहिले होते.
नंतर काही महिन्यांनी शितल आणि तिचा पती जवळच्या इमारतीत राहायला गेले. तरीसुद्धा पुनम यांच्या घरी तिचा येणं-जाणं सुरूच होतं. दरम्यान, २८ ऑगस्ट २०२४ रोजी पुनम यांच्या नातेवाईकाचे लग्न होते. त्यासाठी कपाटातील दागिने काढण्यासाठी गेल्यावर ते सापडले नाहीत. घरातील सर्वांशी विचारणा केली, मात्र दागिने कुठे गेले याचा थांगपत्ता लागला नाही.
शंका शितलवर गेल्यावर तिने आरोप फेटाळले. त्यामुळे कोणावर अन्याय नको म्हणून पुनम यांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मात्र, मे २०२५ मध्ये शितलच्या बहिणीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शितल आणि तिच्या बहिणीने चोरी गेलेले दागिने घातल्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रकार उघड झाला. त्यानंतर तातडीने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
व्हॉट्सअॅप स्टेटसवरील फोटो पुरावा मानत खेड पोलिसांनी शितल वायदंडेला तात्काळ ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली.