विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना जणू आपले जुने सहकारी संजय शिरसाट यांचा पुळका आला आहे. सरकारमधील अंतर्गत राजकारणातून संजय शिरसाट यांची ‘विकेट’ पडण्यासाठी डाव असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. ( Bhaskar Jadhav claims Internal Politics in Government Aimed at Toppling Sanjay Shirsat!)
आधी धनंजय मुंडे, जयकुमार गोरे यांच्या नंतर आता संजय शिरसाट यांची ‘विकेट’ पडली पाहिजे, यासाठी हा डाव सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण सरकारमधील अंतर्गत राजकारणातून घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना एकीकडे आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली असताना, दुसरीकडे त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. संजय शिरसाट यांचा हा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिरसाटांवर आरोप केला की, “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत.” यावर प्रतिक्रिया देताना, हा व्हिडीओ त्यांच्या स्वतःच्या बेडरूममधील आहे आणि त्या बॅगेत पैसे नाही, तर कपडे आहेत, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले होते.
यावर भास्कर जाधव म्हणाले, संजय शिरसाट यांनी आयकर विभागाची नोटीस आली हे कबूल केले आहे. पण आयकर विभागाला ही उघडी बॅग दिसत नाही का? पैशाने भरलेली बॅग संजय शिरसाट यांच्या रुममध्येच होती. त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेत सरळ सरळ पैसे दिसत होते. ते पैसे त्यांचे नसतील तर मला वाटते की त्यांनी ती पैशांची बॅग कुठल्यातरी एका शिक्षण संस्थेला किंवा कुठल्यातरी एखाद्या चांगल्या कामाला दान करून टाकावी. ती बॅग आणि पैसे माझे नाहीत ती मला मिळालेले आहेत आणि हे माझ्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे मी या पैशांचा दानधर्म करतोय असे सांगावे आणि पुण्य मिळवावे.
संजय शिरसाट यांचा व्हिडिओ जवळच्याच कुठेतरी माणसाने काढला असेल किंवा तीन पक्षांच्या या सरकारमध्ये एकमेकांचा पत्ता कापायचे काम सुरू आहे, अशी शंका भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. धनंजय मुंडे यांचा पत्ता कापून झाला, त्यानंतर जयकुमार गोरे यांची विकेट पडता पडता राहिली आणि आता संजय शिरसाट यांची विकेट पडली पाहिजे यासाठी अंतर्गत राजकारणातून हे सगळे घडत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव म्हणाले, महाराष्ट्रामध्ये या लोकांचे सरकार निवडून दिल्याबद्दल जनतेला पश्चाताप होतोय. मोठ्या प्रमाणात यांचे आमदार निवडून आल्यामुळे ही मस्ती आलेली आहे. विरोधी पक्ष हा थोडा आहे आणि आमचा आवाज दाबला जातोय. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात आहेत. आपण यांना या ठिकाणी आणून काय केले याचा विचार जनतेने केला पाहिजे.