विशेष प्रतिनिधी
पुणे: गोव्यातून तस्करी करून आणलेल्या एक कोटी १५ लाखांच्या ५७ हजारांहून अधिक विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे अधीक्षक कार्यालयाच्या सासवड विभागाने ही कारवाई केली. ( Liquor worth Rs 1.15 crore from Goa seized by Excise Department)
गोवा राज्यातून विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सासवड विभागाच्या पथकाने सासवड गावच्या हद्दीत जेजुरी-सासवड रस्त्यावरील वीर फाटा येथे सापळा लावला. पथकाने एका सहाचाकी माल वाहतूक कंटेनरला पकडून त्याची तपासणी केली. संबंधित कंटेनरमधून विदेशी मद्याची तस्करी होत असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांना आढळले.
अधिक तपासणी केली असता संबंधित कंटेनरमध्ये गोवा राज्य बनावटीचे व्हिस्की मद्याच्या १८० मि.ली.च्या बाटल्या असलेले १२०४ बॉक्स आढळले. या प्रत्येक बॉक्समध्ये ४८ मद्याच्या बाटल्या अशा एकूण ५७ हजार ७९२ बाटल्या पथकाने जप्त केल्या. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एक कोटी १५ लाखांच्या ५७ हजार ४०० रुपयांचा मद्यसाठा यासोबतच वाहन, मोबाईल फोन असा एक कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विभागाने संबंधित कंटेनरच्या चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सासवड विभागाचे निरीक्षक संभाजी बरगे करत आहेत.
अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक रोहित माने, धवल गोलेकर, शितल शिंदे, सहायक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, संदीप मांडवेकर, जवान तात्या शिंदे, अमोल कांबळे, दत्तात्रय पिलावरे, संजय गोरे, बाळासो आढाव, वाहनचालक अंकुश कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.