विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मागील महिन्यात अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या भीषण अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला. भारताच्या विमान अपघात चौकशी विभागाने (AAIB) या अपघातावर प्राथमिक अहवाल सादर केला असून त्यात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अहवालानुसार, विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा बंद झाला म्हणजेफ्युएल कंट्रोल स्विचेस’ “RUN” स्थितीतून “CUTOFF” स्थितीत गेले होते. ( Shocking report of Ahmedabad plane crash engine fuel supply cut off while plane was in the air)
बोईंग 787-8 ड्रीमलाइनरने जास्तीत जास्त गती गाठल्यानंतर अवघ्या एका सेकंदात दोन्ही इंजिनचे फ्युएल कंट्रोल स्विचेस ‘CUTOFF’ स्थितीत गेले. काही क्षणांनी स्विच RUN स्थितीत परत आले. इंजिनने पुन्हा चालू होण्याचाप्रयत्न केला. परंतु, तो प्रयत्न असफल ठरला.
AAIB च्या अहवालात 2018 मध्ये अमेरिकेच्या FAA (Federal Aviation Administration) कडून जारी करण्यात आलेल्या Special Airworthiness Information Bulletin (SAIB) चा उल्लेख आहे. यामध्ये काही बोईंग विमानांमध्ये फ्युएल स्विच लॉकिंग फिचर अनायासे निष्क्रिय होण्याची शक्यता दर्शवण्यात आली होती. मात्र हा इशारा ‘अनिवार्य’ नव्हता, त्यामुळे एअर इंडिया यासंदर्भात कोणतीही कृती केली नव्हती.
FAA ने तेव्हा स्पष्ट केले होते की स्विच लॉक अनायासे होण्यामुळे फ्लाइट दरम्यान स्विच ‘कटऑफ’ स्थितीत जाऊ शकतो. हेच आता AI171 च्या दुर्घटनेत प्रत्यक्षात घडले.
एअर इंडियाने अधिकृत सांगितले की, सर्व अनिवार्य सेवा बुलेटिन्स आणि एयरवर्थिनेस निर्देशांचे पालन करण्यात आले होते. पण 2018 च्या SAIB नुसार सूचवलेली तपासणी केली नव्हती कारण ती “फक्त सल्ला होता, सक्ती नव्हती.देखभाल अहवालानुसार, थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल 2019 आणि 2023 मध्ये बदलण्यात आले होते. पण त्या बदलांदरम्यान कोणताही नियमभंग किंवा प्रक्रियात्मक चूक झाल्याचे आढळले नाही.
या अहवालातील सर्वात अस्वस्थ करणारी ओळ म्हणजे कॉकपिटमधील संवाद. अपघाताच्या काही क्षण आधी एका पायलटने दुसऱ्या पायलटला विचारले की “तू इंधन का बंद केलस?” त्यावर दुसऱ्याने उत्तर दिले की “मी नाही केलं.”
AAIB ने अद्याप निष्कर्ष दिलेला नाही की फ्युएल कटऑफ मानवी चूक होती, तांत्रिक बिघाड होता की स्वयंचलित प्रणालीद्वारे हे घडले. परंतु अहवालात हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की पायलट शेवटपर्यंत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते.
बोईंगने निवेदन जारी करत सांगितले की, “आम्ही चौकशीस पूर्ण सहकार्य करत आहोत. या अपघातात जीव गमावलेल्या सर्व कुटुंबीयांबद्दल आमच्या संवेदना आहेत.”
एअर इंडियाने देखील सांगितले की, AAIB आणि इतर नियामक संस्थांना सहकार्य करण्यात येत आहे, आणि भविष्यात अधिक सुरक्षितता पद्धती आखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
AI171 अपघात हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो की, विमानवाहतुकीतील सुरक्षितता केवळ अनिवार्य नियमांमध्येच नाही, तर शिफारसीतही दडलेली असते. फक्त एका स्विचने, एका क्षणात, संपूर्ण विमान आणि त्यातील 260 जीव खाली कोसळले.