विशेष प्रतिनिधी
पुणे : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील जंगलात एका रिक्षाचालकाने दिल्ली येथून दर्शनासाठी आलेल्या व्यापाऱ्याला चाकूच्या धाकाने लुबाडल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१२) घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
( Delhi businessman robbed at knifepoint by rickshaw puller in Bhimashankar forest)
याबाबत सुरेंद्र चंद्र चौहान (वय ६९, रा.दिल्ली) या व्यापाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनोळखी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी दक्षिण दिल्लीतील बदरपूर या भागात राहायला आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ते पुणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेने उतरले. त्यांना बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जायचे होते. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल कार्यालयासमोर एक रिक्षाचालक थांबला होता. व्यापाऱ्याने भीमाशंकरला दर्शनासाठी जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर रिक्षाचालकाने त्यांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन जातो, असे सांगितले. प्रवास लांबचा असल्याने रिक्षाचालकाने अगोदरच भाडे निश्चित केले. भीमाशंकर दर्शनासाठी जादा रिक्षा भाडे द्यावे लागेल, असे रिक्षाचालकाने त्यांना सांगितले.
त्यानंतर रिक्षाचालक सकाळी सव्वानऊच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरातून व्यापाऱ्याला घेऊन निघाला. दुपारी एकच्या सुमारास रिक्षाचालक व्यापाऱ्याला घेऊन भीमाशंकर येथे पोहोचला. दर्शन घेतल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास रिक्षाचालक व्यापाऱ्याला घेऊन पुण्याकडे निघाला. भीमाशंकर परिसरातील जंगलातील रस्त्यावर रिक्षाचालकाने बतावणी करून रिक्षा थांबविली. त्यानंतर व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याला धमकावून ऑनलाइन पद्धतीने साडेचार रुपये घेतले, तसेच त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये असे एकुण मिळून १९ हजार ५०० रुपये लुटले. त्यानंतर जंगलात व्यापाऱ्याला सोडून रिक्षाचालक पसार झाला. घाबरलेला व्यापाऱ्याने या घटनेची माहिती तेथून जात असलेल्या भाविकांना दिली. व्यापारी पुण्यात पोहचला. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल कार्यालय परिसरात भेट दिली. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.