विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि.१६) पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा डॉ. रोहित टिळक, मुलगी डॉ. गीताली टिळक, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले.
( Trustee Editor of Kesari Dr. Deepak Tilak passes away)
वसंत व्याख्यानमाला, टिळक स्मारक मंदिर, हिंदू महिला अनाथ आश्रम, वेदशास्त्त्रोत्तेजक सभा या संस्थांचे ते अध्यक्ष होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते विद्यमान कुलपती होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला डॉ. यांच्या कार्यकाळात मोठी उंची प्राप्त झाली. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा त्यांनी पुढे नेला.
जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. “लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.