विशेष प्रतिनिधी
मुंबई :राज्यात खळबळ उडवणारे हनी ट्रॅप प्रकरण विधानसभेपर्यंत पोहोचली आहे. तब्बल ७२ वरिष्ठ सनदी अधिकारी, राजकीय नेते, आजी माजी मंत्री या जाळ्यात अडकले असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. यामध्ये राजकीय आयएएस, पोलीस अधिकारी, उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यामुळे राज्यातील गोपनीय दस्तऐवज समाजविघातक संघटनांकडे पोहोचण्याची भीती असून, त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर गहिरे संकट ओढवू शकते, असा इशारा देत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी चौकशीची मागणी केली आहे. (Honey trap case in the Assembly72 senior civil servants, political leaders ministers in the net Congress MLA Nana Patole demands an inquiry from the government)
विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले, “राज्यात अतिशय गंभीर आणि संवेदनशील प्रकरण समोर येत आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातील अनेक गोपनीय फाईली आणि माहिती बाहेर जात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात आयएएस अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्री अडकले आहेत. ही केवळ ब्लॅकमेलिंगची बाब नाही, तर राष्ट्रहिताशी संबंधित मोठा धोका आहे.”
पटोले यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली की, “या प्रकरणाची वास्तविक माहिती संध्याकाळपर्यंत सरकारने सभागृहापुढे मांडावी. हे सभागृह म्हणजे जनतेचे मंदिर आहे. त्यामुळे सरकारने या हनी ट्रॅप प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू करावी.” सभागृहातील चर्चेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची योग्य ती दखल घेण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
या हनी ट्रॅप प्रकरणाची सुरुवात नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून झाली. संबंधित अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, काही महिलांनी मोबाईल चॅट, सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना गाठून, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले व नंतर ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी केली. पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त अशा दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नावांचा यात समावेश आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणात एका महिलेविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ अधिकार्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. या महिलेसोबत आणखी काही जणींनी मिळून संगनमताने ही ब्लॅकमेलिंगची योजना आखल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.