विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील ड्रग विक्रीचे रॅकेट किती खोलवर गेले हे दर्शविणारी घटना उघडकीस आली आहे. नामांकित रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीपर्यंत नोकरी करणारा एमबीबीएस डॉक्टर ड्रग तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संबंधित डॉक्टरसह तिघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. ( MBBS doctor from a reputed hospital turns out to be a drug smuggler)
महंमंद ऊर्फ आयान जारून शेख (वय २७, रा. उंड्री) असे डॉक्टरचे नाव आहे. त्याच्यासह सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय २८, रा. हिंगणे खुर्द), अनिकेत विठ्ठल कुडले (वय २७, रा. नारायण पेठ) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद शेख हा मूळचा जम्मूचा असून, त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित रुग्णालयात तो वैद्यकीय प्रॅक्टिस करत होता. यापूर्वी त्याला ड्रग प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर डॉक्टर म्हणून निलंबित करण्यात आले. तरीही त्याने तस्करी थांबवली नाही. आता दुसऱ्यांदा ड्रग्ज तस्करीप्रकरणी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महंमद शेख याच्यासह कुडले यालाही बंडगार्डन भागात ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. ओळखीतील लोकांना एमडी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती, की बिबवेवाडी येथील निमंत्रण हॉटेलसमोरील रस्त्यावर तीन जण एका कारमध्ये संशयास्पदपणे थांबले असून, ते ड्रग्ज विक्री करत आहेत. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. या वेळी शेखकडून पाच लाख रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले, तर सॅम्युअल प्रतापकडून सहा लाख ३८ हजार रुपये किमतीचा आणि कुडले याच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ जप्त केला.