विशेष प्रतिनिधी
पुणे: पद्मावती येथील लुंकड शाळेजवळील तळजाई मैदानावर मंगळवारी (दि. १५) सकाळी साडेसात वाजता स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि पहिलवानांत मारहाणीची घटना घडली होती. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या काही पहिलवानांविरुद्ध खुनाच्या प्रयत्न तसेच अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर आता संबंधित अकॅडमीचे संचालक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Taljai Maidan assault case Case filed against academy driver and students)
याबाबत अमर साबळे (वय २२, सध्या रा. वडगाव बु. मुळ रा. जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विकास मटकरी, मुजीम पठाण आणि पुणे फिटनेस अकॅडमीच्या मुले आणि मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर साबळे हा सध्या वडगाव येथील हनुमान आखाडा कुस्ती संकुल येथे राहण्यास आहेत. मंगळवारी (दि. १५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो आणि त्याचे मित्र ओमकार दगडे, श्रीनिवास पाथरूड, निलेश केदारी हे लुंकड शाळेजवळील तळजाई मैदानावर व्यायाम करीत होते. तेव्हा मटकरी याने दगडे याला धक्का मारला. त्यावेळी फिर्यादीने त्याला याबाबत विचारणा केली. त्याचा राग येऊन मटकरी, पठाण आणि इतर विद्यार्थ्यांनी साबळेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मटकरी याने तुम्हाला ठार मारतो असे म्हणत तो खाली पडला असताना त्याच्या छातीवर लाथांनी मारले. तसेच पठाण याने त्याच्या अवघड जागी जोरजोरात लाथा मारल्या. मटकरी याने साबळेच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने डाव्या हाताने वार अडवला. त्यावेळी त्याच्या हाताला जखम झाली. या घटनेनंतर साबळे याने रुग्णालयात उपचार घेतले. त्यांनतर त्याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आरोपी तसेच फिर्यादी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे अधिक तपास करीत आहेत.