विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानभवन परिसरात सत्ताधारी व विरोधकांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “ही चित्रफीत पाहून एकच प्रश्न पडतो काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?” असा सवाल करत
( What is the situation in Maharashtra Raj Thackerays anger over the clash in the Vidhan Bhavan)
राज ठाकरे म्हणाले, “सत्ता हे साधन असावं, साध्य नाही. पण आजच्या सत्ताधाऱ्यांना याचा विसर पडलाय. वाट्टेल त्यांना पक्षात घेऊन, इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ टीका करण्यासाठी वापरण्याचा प्रकार चाललाय. त्यानंतर साधनशुचितेच्या गप्पा मारणं म्हणजे निव्वळ भंपकपणा आहे. मला खात्री आहे की हे आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं असेल. मी मराठी जनतेलाच विचारतो, कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?”
मराठी माणसाचा अपमान सहन न करण्याचा पुनरुच्चार करत ठाकरे म्हणाले, मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?
विधानभवनात होणाऱ्या खर्चाचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “अचूक आकडेवारी नसली तरी एका दिवशीचं अधिवेशन चालवायला दीड ते दोन कोटींचा खर्च येतो. हे पैसे अशा बिनडोक कारवायांसाठी वाया घालवायचे का? महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांचे पैसे थकले आहेत, जिल्ह्यांना निधी मिळत नाही, आणि तुम्ही इथे तमाशा करताय?”
त्यांनी माध्यमांनाही आवाहन केलं की, “आज जर हे प्रकार माफ केले गेले, तर उद्या विधानभवनात आमदारांचे खून होणार नाहीत याचीही खात्री देता येणार नाही. माध्यमांमध्ये जे काही थोडे शहाणे आवाज उरले आहेत, त्यांनी या भंपकपणात अडकू नये. सरकारला मी स्पष्ट सांगतो. जर तुमच्यात थोडी तरी साधनशुचिता शिल्लक असेल, तर तुमच्या लोकांवर कारवाई करून दाखवा. जर नाही केली, तर मग आमचे महाराष्ट्र सैनिकच हे मुजोर मराठी द्वेष्टे हात सोडून सरळ करतील. त्यावेळी मात्र आम्हाला अक्कल शिकवू नका.”