विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानभवनाच्या परिसरात सगळ्या माध्यमांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकारावर हात उचलल्याचे धक्कादायक प्रकार घडला. आव्हाड यांनी यासंदर्भात दिलगिरीही व्यक्त केली नाही. त्यामुळे यावरून संताप व्यक्त होत आहे. (Jitendra Awhad raised his hand at a journalist in front of the media.)
आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर विधानभवनाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याचवेळी आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवनात उभे होते, तिथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले. त्यामुळे पत्रकारही तिथे आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडीओ पत्रकार शूट करत होते, तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी रागातच ‘लोकमत’च्या रिपोर्टरच्या हातावर मारले.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. गुरूवारी (१७ जुलै) घडलेल्या या घटनेनं विधानभवनात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जितेंद्र आव्हाड विधानभवनाच्या बाहेर उभे होते. तिथे पत्रकार आणि कार्यकर्तेही त्यांच्या आजूबाजूला हजर होते. त्याचवेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तिथे आले. जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांच्यात संवाद झाला. यावेळी जितेंद्र आव्हाड अंबादास दानवेंच्या कानात बोलले. त्यानंतर ते पत्रकारांना म्हणाले शूट करू नका. त्यानंतर रागातच त्यांनी मोबाईलने शूट करत असलेल्या पत्रकाराच्या हातावर जोरात चापट मारली.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला केला. विधानभवनासारख्या पवित्र स्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली. त्याला वार्तांकन करण्यापासून रोखलं. हा केवळ पत्रकारिता नाही, तर लोकशाहीचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, आमचा तो बाब्या तुमचं ते कार्ट. काल विधीमंडळात पुरोगामी शिरोमणी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकाराला मारहाण केली. आता समस्त पुरोगामी, संपादक व पत्रकार संघटना कोणती भूमिका घेणार? कल्पना करा कुणी संघ भाजपा परिवारातील व्यक्तीकडून चुकून एखादा चुकीची शब्द बाहेर पडला तरी ही मंडळी समस्त पत्रकारिता धोक्यात आल्याच सांगत रस्त्यावर येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची भाषण ठोकतात. मग आता इथे आव्हाड सणसणीत पत्रकारांच्या कानाखाली मारतोय. मग आता मंडळी गप्प का?
लोकमत ऑनलाईनचे संपादक आशिष जाधव यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की , काल रात्री विधानभवन आवारातल्या मिडिया पोडीयमसमोरच्या भागात विधानपरिषदेचे मावळते विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्याशी बोलत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अचानक पत्रकारावर हात उचलला. तो तरूण पत्रकार लोकमत डिजिटलचा प्रतिनिधी आदित्य जाधव आहे; तो विधानभवनातल्या राड्यानंतरचं वार्तांकन करत होता. कामाशी प्रामाणिक असणाऱ्या तरूण होतकरू पत्रकाराशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड दिलगिरी व्यक्त करतील नाही करतील, माहीत नाही. पण संपादक म्हणून मी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा निषेध करतोय.