विशेष प्रतिनिधी
शिर्डी : जर सर्वोच्च न्यायालयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत या निवडणुका होतील. हा निर्णय शेवटच्या टप्यात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाचं शिर्डीत आज महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनातून भाजपाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचा सर्वोच्च न्यायालयातील निर्णय झाला तर पुढील तीन-चार महिन्यांत या निवडणुका होतील.आपल्याला विकासाची कामे करायची आहेत. भारतीय जनता पक्षाला विधानसभेत मिळालेला महाविजय जनसामान्यांच्या जिवनात परिवर्तन आणण्यासाठी आहे. तसेच एक पारदर्शी आणि प्रामाणिकतेतून चालणारं सरकार अशी प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारच्या पाठिमागे उभी असलेल्या संघटनेची राहिली पाहिजे. जर अशा दोन्ही प्रतिमा आपण तयार केल्या निश्चित आपल्याला वारंवार मोठा विजय मिळेल.
महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला एक नाही तर तीन वेळा भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा दिल्या. ३० वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त जागा मिळवणारा आपला पक्ष आहे. आपण पाहतो की जसं जी-२० असतं, जी-७ असतं. तसं भाजपाचं जी-६ तयार झालं, म्हणजे जे लगातार तीन वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात, मध्ये प्रदेश, गोवा, छत्तीसगड आणि हरियाणाबरोबर आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी १७ जागा आपल्या निवडून आल्या. जेमतेम ३५ टक्के मार्क घेऊन आपण काठावर पास झालो होतो. मात्र, त्यानंतर आपण विधानसभेला २८८ पैकी २३७ जागा आपण जिंकल्या आणि ८२ टक्के गुण मिळवले. भाजपाने तर ८९ टक्के गुण मिळवले आणि आपला पक्ष मेरिटमध्ये पास झाला”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भाजपात महत्वाचा आहे. राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आणि नंतर सबुरी म्हणजे आपण. हा मंत्र आपण सर्वजण पाळत असतो. आपल्याला माहिती आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सर्व यशस्वी झाले. पण श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांना समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं.