विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह तीन आमदार वसई येथे लिफ्टमध्ये दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका लिफ्टमध्ये अडकले होते. वसई पश्चिम येथील कौल हेरिटेज सिटी येथील इमारत स्वयंपुनर्विकास शिबिरासाठी ते आले होते. यावेळी दरेकर यांच्यासोबत लिफ्टमध्ये गर्दी झाल्यामुळे बिघाड झाला. अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून दरेकरांना बाहेर काढण्यात आले. लिफ्टमध्ये अडकलेले सर्वजण आता सुखरूप आहेत. ( Three MLAs including Praveen Darekar were trapped in the lift they were rescued by breaking the door.)
भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर हे आज वसई येथील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे, नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक देखील होते. लिफ्टमध्ये अडकलेल्यांमध्ये या दोन्ही आमदारांचाही समावेश होता.
वसई येथील कौल हेरिटेज सिटी येथील लिफ्टची क्षमता 10 जणांची होती. मात्र शिबिरासाठी आलेल्या मान्यवरांसोबत 17 जण या लिफ्टमध्ये होते. क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्यामुळे लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि सर्वकजण लिफ्टमध्ये अडकले. यामुळे त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशी चिंताग्रस्त झाले. तातडीने मदतीसाठी धावाधाव करण्यात आली. स्थानिक आणि सुरक्षा रक्षकांनी लोखंडी रॉडच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यश आले आणि सर्वांची सुखरुप सुटका झाली.