विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्यांनी काहीही सांगितले तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ( No matter what is said it is not a matter of honor for us Chief Minister is deeply displeased with Kokate)
विधानसभेत रम्मी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे घडले ते अतिशय चुकीचे आहे. विधान भवनामध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना, आपले काम नसले तरी आपण गंभीर असणे आवश्यक आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचता, किंवा इतर काही वाचता तर ते ठिक आहे. पण रम्मी खेळणे हे काही बरोबर नाही. कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी काहीही सांगितले तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही.
मी सभागृहात रम्मी खेळत नव्हतो तर यूट्यूब पाहत असताना ऑनलाईन आलेली जाहिरात स्किप करत होतो, अशी सारवासारव माणिकराव कोकाटेंनी काल केली होती. त्यांचा दावा खोडून काढण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज आणखी दोन व्हिडिओ शेयर केले होते. विधानसभेसारख्या गंभीर आणि जबाबदारीच्या ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन गैरसोयीचे आणि अनुचित असल्याचे मत अनेक राजकीय नेत्यांनीही व्यक्त केले आहे.
याच कारणावरून लातूरमध्ये छावा संघटनेने देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर सुरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली.