विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अमर्याद संधींची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारचे स्वागत केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान कियर स्टार्मर यांचे अभिनंदन केले आहे.
( Farmers and artisans of Maharashtra will benefitChief Minister welcomes India-United Kingdom Free Trade Agreement)
मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात की, ‘या करारामुळे भारतीय शेतकरी, विविध प्रकारच्या कारागिरांना तसेच सेवा क्षेत्राला फायदा होणार आहे. विशेषत: जागतिक पातळीवर पोहचण्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि कारागीरांचे सक्षमीकरण होणार आहे. राज्यातील आंबा, द्राक्ष, फणस तसेच तृणधान्ये आणि सेंद्रीय उत्पादक, निर्यातदार शेतकऱ्यांना या करारातून लाभ होणार आहे.
चर्मोद्योग आणि पादत्राणे क्षेत्रासाठी शुन्य निर्यात शुल्क धोरणामुळे कोल्हापूरी चपलांच्या उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
हळद आणि अन्य तत्सम मसाले उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. राज्यातील विविध भागांतील अशा सर्वच लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी हा करार एक मोठी संधी घेऊन येतो आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच परंपरागत उद्योग- व्यवसाय क्षेत्रासाठी अमर्याद संधीची कवाडे खुली होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या कराराचे मनापासून स्वागत करतो, त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वाचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.