विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाषा हे संवादाचे प्रभावी साधन असून या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( While being proud of ones mother tongue one should respect other languages appeals Chief Minister Devendra Fadnavis)
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित , तंजावर घराण्याचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, कुलसचिव प्रा. रविकेश उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृष्टी आणि युद्धनीतीचा अभ्यास जेएनयूसारख्या प्रतिष्ठित संस्थेत सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “युनेस्कोने शिवरायांच्या १२ किल्ल्यांना ‘मराठा मिलिट्री लँडस्केप’ म्हणून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. शिवाजी महाराजांनी सह्याद्री, पश्चिम घाट आणि समुद्रकिनारी अभेद्य किल्ले बांधून परकीय धोके ओळखले आणि मराठ्यांना संपूर्ण भारतात आपला झेंडा फडकविण्यास प्रेरित केले. शिवरायांच्या युद्धनीतीचे आजही जगभरात कौतुक होते. महाराजांची प्रत्येक लढाई हे सामरीक शक्तीचे उदाहरणं असून शिवाजी महाराजांमुळे स्वराज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसामध्ये विजिगीषूवृत्ती रुजविली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मराठी ही अतिप्राचीन भाषा आहे. आपल्या ‘नेव्ही’च्या ध्वजावर देखील राजमुद्रा झळकली आहे आणि मराठीची राजमुद्रा आता दिल्लीत देखील स्थापित झाली आहे. आजही मराठी साहित्य, मराठी नाट्यसृष्टी ही सर्वोत्तम आहे. रंगभूमी देखील ज्या भाषेने टिकवली ती भाषा म्हणजे मराठी. सगळ्या विद्यापीठांत मराठी भाषेवर संशोधन झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
मराठी ही अतिप्राचीन भाषा आहे. तिला अभिजात दर्जा मिळणे हा राजाश्रय आणि राजमुद्रेचा क्षण आहे. मराठी भाषेतील साहित्याने देशाला समृद्ध केले आहे असे त्यांनी सांगितले. ‘जेएनयू’ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली असून हा पुतळा देशासाठी बलिदान आणि समाजसेवेची प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.