विशेष प्रतिनिधी
मुंबई”रोमान्स किंग” अशी ओळख असलेले शाहरुख खानच्या सर्वात यशस्वी रोमँटिक चित्रपटालाही आता नवोदित कलाकारांनी मागे टाकलं आहे. अनीत पड्डा आणि अहीन पांडे यांच्या पहिल्याच चित्रपटाने बॉलीवूडच्या इतिहासात नोंदवला जाईल असा विक्रम केला आहे.
( Saiyaar is a super hit at the box office leaving behind Shahrukh Khans Chennai Express)
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या रोमँटिक ड्रामाने प्रदर्शित होऊन फक्त १० दिवसांत तब्बल ₹२४२ कोटींची कमाई केली आहे. यामुळेच २०१३ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘चेनई एक्सप्रेस’च्या ₹२२७ कोटींच्या कलेक्शनलाही ‘सैयारा’ने मागे टाकले आहे.
सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी (९व्या दिवशी) ₹२६.२५ कोटींची कमाई केली. ही कमाई पहिल्या शनिवारीपेक्षा जास्त आहे. हे सध्याच्या काळात अत्यंत दुर्मिळ मानले जाते. रविवारी तर कमाईने ₹२५ कोटींचा आकडाही पार केला आणि ही संख्या रात्रीपर्यंत आणखी वाढण्याचीशक्यता वर्तवण्यात आली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितले, “सैयारा दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचतोय. २०० कोटींचा टप्पा पार करत सिनेमा आता थेट ₹३०० कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे.
‘सैयारा’ ही एक भावनिक संगीतमय प्रेमकहाणी आहे ज्यात एक गायक आणि एक गीतकार यांच्या आयुष्यातील प्रेम, संघर्ष, यश, हार, आणि विरह यांचं वास्तवदर्शी चित्रण करण्यात आलं आहे. अनीत पड्डा आणि अहीन पांडे या नवोदित जोडीची केमिस्ट्री आणि अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
यशराज फिल्म्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनीत पड्डा हिला भविष्यात मोठ्या स्केलवर ‘बिग स्क्रीन हिरॉईन’ म्हणून उभं करण्याचा विचार आहे. ‘सैयारा’च्या यशानंतर OTT वर येणाऱ्या तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी चर्चा आहे.
इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी विशेष पोस्ट करत अहीन म्हणतो, “#OneWeekOfSaiyaara . प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार. माझ्या पहिल्याच चित्रपटाला इतका प्रतिसाद मिळणं, हे स्वप्नवत आहे.”
हा सिनेमा बॉलीवूडमध्ये नव्या चेहऱ्यांना दिलेला विश्वास आणि संगीतातून सांगितलेली सशक्त कथा या दोन्ही गोष्टींसाठी ओळखला जाईल. सध्या ‘सैयारा’ थेट ‘बॉक्स ऑफिस फिनॉमेनन’ ठरत आहे. ‘सैयारा’ने सिद्ध केलंय की चांगली कथा, उत्कृष्ट संगीत आणि प्रामाणिक अभिनय एकत्र आले तर प्रेक्षक त्याचं मनापासून स्वागत करतात.