विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला असल्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू महाग होणार आहेत. त्याचा परिणाम भारताच्या व्यापाऱ्यावर होणार आहे. एक ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आकारले जाणार आहे.
( US President Donald Trumps 25 percent tariff on India Indian goods will be expensive in America)
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये सारं काही आलबेल नाही, अशी पोस्ट केली आहे. भारतावर 25 टक्के टॅरिफची घोषणा करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारत हा आपला मित्र देश असला तरी, आपण त्यांच्याशी तुलनेने कमी व्यावसाय केला आहे. त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे. त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर-आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे. ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. चीनसह, ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहे. हे सर्व काही चांगले नाही. त्यामुळे भारताला 1 ऑगस्टपासून 25 टक्के आयात शुल्क तसेच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा करताना ट्रथ सोशलवर दोन पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये भारतावर 25 टक्के टॅरिफ लादणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबरची व्यापार तूट मोठी असल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान देश बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला ट्रम्प यांनी मुदतवाढ 1 ऑगस्टपर्यंत दिली होती. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती होत नव्हती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवरुन भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.