विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागाने निवडलेल्या जागेवर महादेवी (माधुरी) हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास वनतारा संस्था राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. (Vantara officials meet Chief Ministerassure help in setting up a rehabilitation center for elephants near Nandani Math)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महादेवी हत्तीण माधुरीला पुन्हा नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकार याचिका दाखल करणार आहे. या याचिकेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.’
नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वनतारामध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये असंतोष असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या निर्णयाविरोधात चालवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केल्या आहेत. स्वाक्षरी केलेले हे फॉर्म आता राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे.