विशेष प्रतिनिधी
पुणे : वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी तसेच नागरी सुविधा उभारण्यासाठी तीन नव्या महापालिका करण्याचा प्रस्ताव आहे. हिंजवडी , चाकण आणि पूर्व पुण्याची मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागाची एक महापालिका अशा तीन नव्या महापालिका पुणे जिल्ह्यात करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. वाहतूक कोंडी तसेच नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. कोणाला आवडेल किंवा नाही, तरीही मी करणारच असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. (Ajit Pawars Solution to Traffic Congestion Three New Municipal Corporations in Hinjewadi Chakan and East Pune)
हिंजवडी , चाकण हे आयटी आणि ऑटो हब वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. येथील अनधिकृत बांधकामे, वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी तेथील ग्राम पंचायती एवढ्या सक्षम नाहीत. यामुळे पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. चाकण आणि परिसरात एक महापालिका, हिंजवडी भागात एक महापालिका आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागाची एक महापालिका होणार आहे.
चाकण भागातील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पहाटे ५.४५ वाजताच अजित पवार चाकणला पोहोचले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, तळेगाव ते शिक्रापूर मार्ग सहा पदरी करणार आहे. पुणे-नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करू, तुमची त्रासातून मुक्तता करु. चाकण एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यांची कोंडी फोडावी लागणार आहे.