विशेष प्रतिनिधी
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातगुन्हा दाखल झाला आहे. तनिषा भिसे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ( A case has been registered against Dr. Sushrut Ghaisas of Dinanath Mangeshkar Hospitaldelay in treatment even after Tanisha Bhise was in the OPD for four and a half hours)
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. महिलेसोबत नेमके काय घडले होते? याबाबत शासनाने चौकशी समित्या नेमल्या होत्या. त्यातील ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी अलंकार पोलीस ठाण्यात भिसे कुटुंबियांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. डॉ. सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कलम 106(1) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, ससूनकडून अहवाल नव्याने मागवला होता. त्या अहवालात डॉ. सुश्रुत घैसास यांनी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेचार तास रुग्ण घैसास यांच्या ओपीडीमध्ये होता. मात्र उपचार सुरू न करता वेळकाढूपणा करण्यात आला. यामध्ये संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला, असेही अहवालात सांगितले असल्याची माहिती संभाजी कदम यांनी दिली.