विशेष प्रतिनिधी
पुणे :b देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळल्याने एका हिरे व्यापाऱ्याने स्वत:च अपहरणाचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ( A diamond merchant, fed up with the harassment of creditors, faked his own kidnapping.)
हा हिरे व्यापारी बिबवेवाडी येथे राहण्यास आहे. सोमवारी पत्नीसह त्याने मुलीला शाळेतून आणले. दोघींना त्याने सोसायटीच्या आवारात सोडले. त्यानंतर कॅम्प परिसरात काही कामानिमित्त जात असल्याचे सांगत दुचाकीवरून तो तिथून निघाला. काही वेळात त्याचे अपहरण झाल्याचा दावा करीत एका अज्ञात व्यक्तिने व्यापाऱ्याच्या पत्नीकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. पत्नीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
व्यापाऱ्याचे अखेरचे लोकेशन हे नवले पुलाजवळ असल्याचे समजले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांचा तपास सुरू होता. त्यानुसार पोलिसांचे एक पथक मुंबई तर दुसरे पथक बेंगळुरूकडे रवाना करण्यात आले होते.
हिरे व्यापाऱ्याचा फोन बंद असल्याने तांत्रिक तपासात अडचणी येत होत्या. मात्र शुक्रवारी त्याने काही काळ फोन सुरू करून आपल्या बहिणीशी संवाद साधला. त्यानंतर पुन्हा फोन बंद केला. पोलीस तपास सुरू असताना अचानक बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पोहोचला.
स्वत:च्या अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली. काही जणांकडून कर्जाने रक्कम घेतली होती. देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्याने पोलिसांना संगितले. व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितले की, कुटुंबाला अपहरणाचा खोटा कॉल करून नवले ब्रिज येथे स्वतःचा फोन बंद केला. रावेत येथे व रावेत येथून खासगी गाडीने कळंबोली मुंबई येथे, त्यानंतर बॉम्बे सेंट्रल येथे पोहोचला. तेथे एक दिवस लॉजवर, तर खार वेस्ट मुंबई येथील लॉजवर दोन दिवस व एक दिवस विलेपार्ले येथे राहिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.