विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेताना ‘तिसऱ्या मुंबई’मध्ये एक जागतिक दर्जाची क्रिएटिव्ह इकोसिस्टम उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ( A global hub of creativity will be set up in the third Mumbai announced Chief Minister Devendra Fadnavis at the Waves 2025 conference.)
मुंबईत सुरू असलेल्या ‘वेव्हज २०२५’ या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य शिखर परिषदेत ते बोलत होते. ‘स्टुडिओ आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (FICCI) आणि राज्य सरकारच्या संयुक्त बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “नवी मुंबईतील ‘तिसरी मुंबई’ ही केवळ निवासी किंवा व्यापारी केंद्र न राहता सर्जनशीलतेचं जागतिक केंद्र बनेल. यासाठी प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबत दोन महत्वाचे सामंजस्य करार झाले असून यामुळे जागतिक दर्जाचे स्टुडिओ, व्हिज्युअल प्रोडक्शन सुविधा आणि अत्याधुनिक उपकरणे मुंबईत उपलब्ध होतील.”
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला तो म्हणजे आयआयसीसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह अँड कंटेंट टेक्नॉलॉजीज)ची स्थापना (IICCT Indian Institute of Creative and Content Technologies). आयआयटी मुंबईच्या तांत्रिक मार्गदर्शनाने ही संस्था सर्जनशील उद्योगातील शिक्षण व संशोधनासाठी स्थापन केली जाणार आहे. “यामुळे तरुणांना गेमिंग, व्हीए एक्स ( VFX), अॅनिमेशन, फोटोग्राफी, चित्रपट लेखन अशा विविध माध्यमांमध्ये करिअर संधी उपलब्ध होतील,” असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार लवकरच ई-स्पोर्ट्ससाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणार आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, आर्थिक मदत व प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात येत आहेत. डिजिटल क्रिएटर्ससाठीही स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्याचे संकेत त्यांनी दिले.
फडणवीस म्हणाले की, चित्रपट, जाहिरात, वेबसिरीज इ. चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्या घेणे आता अधिक सुलभ व पारदर्शक झाले आहे. नोंदणी, अर्ज, शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर केवळ ७ दिवसांत परवाना मिळतो.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उद्योग आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अभिनेता व निर्माता आमिर खान, एफआयसीसीआयचे आशिष कुलकर्णी, आणि अनेक क्रिएटिव्ह उद्योग तज्ज्ञ उपस्थित होते.
या परिषदेमध्ये विविध स्टार्टअप्स, उद्योजक, मीडिया कंपन्यांचे प्रतिनिधी आणि सर्जनशील उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी भाग घेतला. ‘वेव्हज २०२५’ ही परिषद भारताला जागतिक मीडिया हब बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरते आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून महाराष्ट्र देशातील सर्जनशील अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ बनेल, अशी आशा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.