विशेष प्रतिनिधी
पुणे : बस स्टॉप वरून घरी निघालेल्या महिलेला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत फसवून तिच्याकडील दोन तोळ्याची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना ससून रुग्णालय परिसरात शनिवारी (दि. 2) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. ( A woman pedestrian was robbed by a man pretending to be a policeman in the Sassoon Hospital area.)
याबाबत चंद्रकला बाहेती (वय 78, रा. बर्के आळी, जिल्हा परिषदेच्या मागे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणखी एका महिलेसोबत बस स्टॉपवरून घराकडे पायी निघाल्या होत्या. ससून आउटगेटच्या समोर आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींनी त्यांना अडवले. त्यापैकी मागे बसलेल्या आरोपीने आपण पोलीस इन्स्पेक्टर असल्याची बतावणी केली. तुम्ही पुढे जाऊ नका. पुढे खून झाला आहे. सर्व चेकिंग चालू आहे. तुम्ही पेपर वाचत नाही का. तुमच्या गळ्यातील सोने काढून पर्समध्ये ठेवा, असे सांगून चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. फिर्यादी महिलेने गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी गळ्यातून काढली असता चोरट्यांनी ती ताब्यात घेऊन तिथून पळ काढला. त्यानंतर महिलेने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार बंद गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करीत असून तांत्रिक तपास सुरू असल्याचे तपासी अधिकारी गणेश चव्हाण यांनी सांगितले.