पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला फसवून आसाममधून पुण्यात आणण्यात आलं आणि तिची पाच लाख रुपयांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री करण्यात आली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात एका अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
( A young woman was lured to Pune on the pretext of marriagesold in a brothel for five lakhs a case was registered against four people including a police officer.)
२५ वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम (रा. आसाम) याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत फसवले. जानेवारी महिन्यात त्याने तिला आसाममधून पुण्यात आणले आणि बुधवार पेठेतील कुंटणखान्यात पाच लाख रुपयांना विकले.
त्यानंतर पापा शेख आणि अधुरा शिवा कामली (दोघेही रा. बुधवार पेठ) यांनी तिला धमकावून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. या टोळीच्या ओळखीच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पीडितेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला, असंही तिने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
गेल्या चार महिन्यांपासून या अमानुष परिस्थितीला सामोरे जात असलेल्या पीडित तरुणीने अखेर हिंमत करून स्वतःची सुटका केली आणि पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव करत आहेत