विशेष प्रतिनिधी
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे. ( Abu Azmi is a pest to Maharashtra NCP demands strict action against provocative statements)
आमदार अबू आझमी म्हणाले आहेत की आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले, तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिमांबाबतीत हे करत आहेत.
यावर परांजपे म्हणाले,आषाढी वारीला ८०० वर्षाची परंपरा आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक ओळख आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीवरुन पालखी निघते.संत तुकारामांच्या देहू येथूनही पालखी निघते. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळी मुस्लिम समाजाचे अनेक बांधव त्या वारीत सहभागी होतात आणि वारकर्यांना सेवा देतात याची आठवणही आनंद परांजपे यांनी अबु आझमी यांना करून दिली आहे. कायम हिंदू – मुस्लिम राजकारण करुन अबु आझमी प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सरकारने करावी.
छत्रपती संभाजी महाराजांना पकडून क्रूर पध्दतीने हालहाल करुन हत्या केली हा इतिहास महाराष्ट्र कधी विसरु शकणार नाही. त्यामुळे अशा औरंग्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात कुठेही स्थान नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा परांजपे यांनी दिला आहे. ते म्हणाले, औरंगजेब हा क्रूर राज्यकर्ता होता. ज्याने आपल्या स्वतःच्या वडीलांना आठ वर्षे कैदेत ठेवले. राजगादीवर बसण्यासाठी आपल्या सख्ख्या भावांना ठार मारले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक आक्रमणे केली .
महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. त्यामुळे मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल अशाप्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार कधीही घेणार नाही असे सांगून परांजपे म्हणाले, आजच रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर एक बैठक ठेवली आहे. जो जीआर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून निघाला यामध्ये पहिली ते पाचवी महाराष्ट्रातील सर्व शाळांना मराठी हे अनिवार्य आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा भारतातील कुठलीही भाषा घेऊ शकतो. २० विद्यार्थी जी भाषा घेतील त्यासाठी लागणारा शिक्षक घेणे ही त्या शाळेची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे मराठी ही भाषा महाराष्ट्राची आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे हेदेखील विसरता कामा नये. राज्यसरकार मराठी भाषेविषयी संवेदनशील आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीही वारीबाबत वक्तव्यावरून मला वाटते की अबु आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याची आवड आहे. वादग्रस्त विधाने केली की प्रसिद्धी जास्त मिळते, असे त्यांना वाटते. त्यामुळेच मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळेच मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.