विशेष प्रतिनिधी
गांधीनगर : कोणीही ‘पुरावा दाखवा’ म्हणू नये म्हणून कॅमेऱ्यासमोर कारवाई केली. २२ मिनिटांत ९ दहशतवादी ठिकाणांचा नाश केला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबरोबरच विरोधकांनाही सुनावले. ( Action in front of the camera so that no one says show proof’PM addresses Pakistan as well as the opposition)
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान तसेच काँग्रेसने कारवाई केल्याचे पुरावे मागितले होते. त्यांना उत्तर देताना मोदी म्हणाले, भारताने ६ मे रोजीच्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये केवळ २२ मिनिटांत ९ दहशतवादी ठिकाणांचा नाश केला, असे त्यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे ही कारवाई संपूर्णपणे कॅमेऱ्यांसमोर झाली असून, यावेळी कोणीही ‘पुरावा दाखवा’ अशी मागणी करणार नाही.
मोदी म्हणाले की, ६ मेनंतर ज्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला, त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृतदेहांवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पांघरला गेला आणि पाकिस्तानी लष्कराने त्यांना सलामी दिली. हेच सिद्ध करतो की हे केवळ प्रॉक्सी वॉर (proxy war) नसून पाकिस्तानची अधिकृत युद्धनीती आहे.जेव्हा एखाद्या दहशतवाद्याला राष्ट्रध्वजात गुंडाळून सन्मान दिला जातो, तेव्हा ते केवळ दहशतवाद नसतो, ती राष्ट्रपुरस्कृत लढाई असते,” असं मोदींनी ठामपणे सांगितलं.
मोदींनी स्पष्ट केलं की, भारताने यावेळी केवळ लष्करी कारवाई केली नाही, तर जगाला ठोस संदेश दिला की, भारत दहशतवादाला एक इंचही मुभा देणार नाही. ही जमीन पराक्रमाची आहे. मागील वेळेस काही जणांनी पुराव्याची मागणी केली होती. यावेळी संपूर्ण कारवाई कॅमेऱ्याच्या समोर झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सत्य दिसेल. आता कुणालाही प्रश्न विचारायची गरज नाही.
आपण कोणाशी वैर नाही ठेवत. शांतता ही आपली प्राथमिकता आहे. पण जर कोणी युद्ध लादत असेल, तर उत्तर देण्याची क्षमता आपल्यात आहे,” असे ते म्हणाले.
या भाषणाआधी पंतप्रधानांनी गांधीनगरमध्ये भव्य रोड शो केला. राजभवन ते महात्मा मंदिर दरम्यान हजारो नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन मोदींचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यातील हा त्यांचा चौथा रोड शो होता. याआधी त्यांनी वडोदरा, भुज आणि अहमदाबाद येथेही जनतेशी थेट संवाद साधला होता.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अमरनाथ यात्रेच्या तयारीदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी गटांच्या ठिकाणांवर लक्ष्य साधले. ही कारवाई उपग्रहद्वारे निरीक्षणाखाली पार पडली. जागतिक माध्यमांनीही भारताच्या धोरणात्मक क्षमतेचे कौतुक केले.