विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील ॲप वर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ( Action will be taken if app-based busescars bike taxis violate rules warns Pratap Sarnaik)
विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी च्या विविध विषयासंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते.यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणा-या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले आहे. कोणत्याही ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे.राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर शासन कडक कारवाई करेल. ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात, शासनाने बनविलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.