विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट केले. कन्नड येते का विचारत एसटी कर्मचाऱ्याला काळे फसले. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय आहे.
कर्नाटक हद्दीतील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे हा प्रकार घडला. दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. यामध्ये सीमा भागासंदर्भात ठराव होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला करत कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसला काळे फसले. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केली. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का ? अशी विचारणा केली. या प्रकारानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
एसटी महामंडळाने महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यानी एसटी आणि चालकाला काळे फासण्याच्या घटनेचे हे पडसाद आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. सकाळी दहा नंतर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. परिस्थिती पाहून एसटी सेवा पूर्ववत सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बेळगाववरुन सीमावाद आहे. त्यावरुन दोन्ही राज्यात हिंसक आंदोलनं झाली आहेत. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले आहेत. 2022 साली डिसेंबर महिन्यात बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर जोरदार हल्ला केला होता.