विशेष प्रतिनिधी
मुंबई : मला पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली असली तरी निश्चितपणे भरत गोगावले यांचा अनेक वर्षांचा जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे. आता ते मंत्री म्हणून देखील काम करत आहेत. त्यामुळे आम्ही व्यवस्थितपणे समतोल राखून काम करु आणि रायगड जिल्ह्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल? यासाठी काम करणार आहोत, असे महिला आणि बालकल्याण मंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी महायुती सरकारने शनिवारी जाहीर केली. मात्र, पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आलं. भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. पण रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं. त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अनपेक्षित, मनाला न पटणारा आहे .आम्हाला हे धक्कादायक वाटतेय. आमच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटी घेऊन कळवले होते. आमचे नेते एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल, असे गोगावले म्हणाले होते.
आता आदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नाराजीवर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ‘आमच्या कोणत्याही सहकार्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री म्हणून मला जबाबदारी दिलेली असली तरी भरत गोगावले आणि आम्ही समतोल राखून काम करू’, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
“महायुतीच्या कोणत्याही सहकार्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आमच्या तीनही नेत्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जबाबदारी दिलेली आहे. भरत गोगावले हे आमचे सहकारी मंत्री आहेत. आता ते मंत्री म्हणून देखील काम करत आहेत. त्यामुळे आम्ही व्यवस्थितपणे समतोल राखून काम करु आणि रायगड जिल्ह्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल? यासाठी काम करणार आहोत, असे महिला आणि बालकल्याण मंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.