विशेष प्रतिनिधी
मुंबई : पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. ( Administration on alert mode due to rain Chief Minister Devendra Fadnavis is personally taking a review)
दरम्यान, राज्यातील या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना विविध यंत्रणांकडून अवगत करण्यात आले. राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मोबाईल सेवा रविवारी विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे. फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.
मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिव तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ – एसडीआरएफ, अग्निशमन, महसूल प्रशासन तसेच गृह विभाग आदींना नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना आणि मदत व बचावासाठीची सज्जता ठेवण्याच्या अनुषंगानेही त्यांनी विविध सूचना केल्या. जलसंपदा विभागाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.