विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे कौटुंबिक न्यायालय वकिल संघटनेच्या वार्षिक निवडणुकीत ‘एकता पॅनेल’ने सर्व ११ पदांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. अध्यक्षपदी अॅड. कल्पना निकम यांची निवड झाली आहे.
( Adv. Kalpana Nikam as President of Family Court Lawyers Association Adv Bhoite Adv. Deshpande as Vice Presidents)
शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालय परिसरात शुक्रवारी ही निवडणूक पार पडली. विविध पदांसाठी एकूण २२ उमेदवार रिंगणात होते.
अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत अॅड. कल्पना निकम यांनी २९० मते मिळवत स्पष्ट आघाडीने विजय मिळवला. अॅड. प्रगती पाटील यांना १३० तर अॅड. धनश्री पाटील यांना केवळ ९ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी अॅड. प्रथमेश भोईटे (२७७ मते) आणि अॅड. स्मिता देशपांडे (२५२ मते) विजयी ठरले.
सचिवपदासाठी अॅड. कोमल देशमुख यांनी सर्वाधिक ३१२ मते मिळवत विजय संपादन केला. सहसचिवपदी अॅड. चार्मेन अॅन लाझरस यांची निवड झाली. खजिनदारपदासाठी अॅड. राहुल जाधव विजयी ठरले.
कार्यकारिणी सदस्यपदी अॅड. अमृता पवार, अॅड. प्रतीक्षा राठी, अॅड. संभाजी पांचाळ, अॅड. अमोल उजनकर आणि अॅड. निलेश वारणकर यांची निवड झाली.
मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. निकाल उशिरा रात्री जाहीर करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. संतोष नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांना अॅड. रमाकांत वैदकर आणि अॅड. विलास राऊत यांनी सहकार्य केले.