विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असताना आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या कथित समाधीवरून आता वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या कथित समाधीविरोधात युवराजभूमिका घेतली आहे. (After Aurangzeb’s tomb, now the tomb of the Vaghys dog is in controversy, demand to remove the statue from Rajgad)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून बसवण्यात आलेल्या पुतळ्याविरोधात संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत. पुतळा त्वरित येथून हटवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. याबाबत सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणतात, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारली आहे. वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणतात, समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा आणि महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे.