विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी जशी शिवसेना उभी केली, तशी एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना उभी केली, अशा शब्दांत जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुक केल्याने ठाकरे परिवार नाराज झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी नाराजीचा निरोपही त्यांना पाठविला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात आशा भोसले उपस्थित होत्या. बाळासाहेबांनंतर शिवसेना उभारणीचे श्रेय त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.कौटुंबिक संबंध असूनही बाळासाहेबांनंतरची खरी शिवसेना उभारण्याचं श्रेय एकनाथ शिंदेंना दिल्यामुळे ठाकरे कुटुंबीय आशा भोसले यांच्यावर संतापले आहे.
आशा भोसले म्हणाल्या होत्या, तुम्ही मला फार आवडता, तुम्ही काम करता, हे आम्हाला आत्ता कळले. तुम्ही अचानक वरती आलात.. बाळासाहेबांनी जशी शिवसेना घडवली, तशी तुम्हीही पुन्हा शिवसेना घडवली. त्यामुळे मला तुमचा अभिमान वाटतो. कारण त्यावेळी सगळंच काही निवळलं होतं. त्यावेळी तुम्ही आलात. लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलंत, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही त्यांना धैर्याने सामोरे गेलात आणि यश संपादन केले. तुम्हाला अजूनही भरपूर यश मिळेल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. तुम्ही ऐकत असाल, नसाल पण माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल. शतायुषी व्हा, चांगले कार्य केले तर कुणीही कधीही संपत नाही.
शिंदे यांचे या पद्धतीने केलेले कौतुक ठाकरे कुटुंबाला आवडले नाही. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ठाकरे कुटुंब आणि मंगेशकर कुटुंबाचा स्नेह आहे. आशा भोसले अनेकदा मातोश्रीवर जात असतात. त्यामुळे आशा भोसले यांनी केलेले शिंदे त्यांचे कौतुक ठाकरे कुटुंबाला चांगलेच झोंबले आहे